‘खडसेसाहेब अन् रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादीला निश्चितच नवे बळ, उर्जा मिळाली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला निश्चितच बळ आणि उर्जा मिळाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (ajit-pawar-welcome-eknath-khadse-ncp) खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आहे.
खान्देशासह संपूर्ण राज्यात त्यांचा पक्षवाढीसाठी फायदा होईल. खडसाहेबांसोबत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हार्दीक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खडसे यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी काही दिवस थांबा कुणी किती भूखंड घेतले आहेत, हे सांगतो, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

मी खूप संघर्ष केला. हा संंघर्ष केवळ भाजपातच नाही. तर अगदी मंत्रीमंडळातही केला. 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली होती. मात्र आजवर प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे खडसे म्हणाले. 40 वर्षात केवळ महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही. कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशाराही दिला. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केले आहे. तितक्याच निष्ठने राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.