सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच फडणवीसांना भेटल्याबाबत अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न काल (8 डिसेंबर) माढ्यात पार पडलं. या लग्नात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेजारी गप्पा मारल्या होत्या. या वरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालंय, असं समजण्याचं कारण नाही. आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्या असं अजित पवार म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की , ‘संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारीच लावली असल्याने एकत्र बसलो होते. यावेळी मी त्यांना हवा पाण्याबद्दल विचारत चौकशी केली. राजकीय व्यक्ती कधी कायमच एकमेकांचे दुश्मन नसतात. सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसरं काहीही नव्हतं. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला आणि इतरांना बोलावलं होतं, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो.’

शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं मिळून सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालं असतानाच अचानक नाट्यमय घडामोडी घडून अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा द्यावा लागला होता .

Visit : Policenama.com

You might also like