अजित पवारांनी केलं ‘बंड’ अन् सुप्रिया सुळेंना मिळणार ‘लाभ’, ‘संयम’ राखून दाखवली नेतृत्वाची ‘छबी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील तीन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कसोटीचे दिवस होते. अजित पवारांनी अचानक भाजपला पाठिंबा दिल्याने आता पक्ष आणि कुटूंबात फूट पडतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू काल सर्व काही सुरळीत झाले आणि पक्षात पुन्हा चैतन्य आले. परंतू या कसोटीच्या काळात सुप्रिया सुळे यांनी पक्षात महत्वाची भूमिका निभावली. अजित पवारांनी पक्षाशी फारकत घेतल्याने सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलेले अश्रू सर्वांनीच पाहिले.

परंतू अश्रू पुसून सुप्रिया सुळे यांनी स्वत:ला सावरलं आणि वडिलांसोबत जाऊन पक्ष सारवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळपासून सुरु झालेला हा सत्तासंघर्ष मंगळवार दुपारी संपुष्टात आला. परंतू या काळात सुप्रिया सुळे यांनी तीनही दिवस वडिलांना सावलीसारखी साथ दिली. दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळे मागील तीन दिवस राष्ट्रवादीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिल्या. अन्य पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची, रणनिती ठरवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी निभावली.

ज्या हॉटेलवर राष्ट्रवादीचे आमदार होते त्या हॉटेलवर त्यांच्या अनेक फेऱ्या झाल्या. आमदारांची फाटाफूट रोखण्याच्या या ऑपरेशनमध्ये त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या, आवश्यक तेथे त्यांनी आपला सल्ला दिला असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

आमदारांची दोन गटात विभागणी केल्यास व्यवस्थापन करणं सोपं जाईल असा सल्ला देखील त्यांनी दिला असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या 34 आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये तर 12 आमदारांना सोफीटेल हॉटेलवर ठेवण्यात आले. 2006 पासून सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या. सर्व प्रथम राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या 2009 पासून सातत्याने निवडून आल्या आहेत.

सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार राज्यात असे संकेत राष्ट्रवादीकडून कायमच देण्यात आले. शरद पवारांचा राजकीय वारसा कोण, अजित पवार की सुप्रिया सुळे यावर नेहमीच चर्चा सुरु होती. परंतू आता अजित पवारांनी बंडखोरी केल्यानं सुप्रिया सुळेंचे पक्षातील स्थान आता चांगलेच बळकट झाले आहे.

Visit : Policenama.com