गरीबांच्या संघर्षाची सरकारला जाणीव नाही : अजित पवार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 28 नाेव्हेंबर राेजी लागलेल्या आगीत पाटील इस्टेट येथील शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. अनेकांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेच्या पंधरा – वीस दिवसानंतर कोणाच्याही मदती शिवाय झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी स्वतःच आप आपली घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीशी संलग्न असणाऱ्या शिवराय पथारी या संघटनेच्या वतीने शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील सुमारे 306 कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी पाटील इस्टेट झाेपडपट्टी जळीतग्रस्तांनी स्वतःला एकटे न समजता, आत्मविश्वास न गमवता पुन्हा एकदा संसार उभे केले पाहिजेत राष्ट्रवादी कायम संपूर्ण ताकदीने त्यांच्याबराेबर आहे असा विश्वास अजित पवार यांनी येथील रहिवासियांना दिला.

अजित पवार प्रसंगी असेही म्हणाले, केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेत जे सरकार सध्या आस्तित्वात आहे. ते मोठमोठ्या उद्योगपत्यांच्या तसेच सुटा-बुटातील लोकांच्या कामाचे सरकार असून त्यांना गरीबांच्या जगण्याच्या संघर्षाची जाणीव नाही. लोकांचे जगण्याचे प्रश्न आणखी वाढत असतांना यांना स्मार्ट सिटी सारखी उठाठेव करावशी वाटते.

यावरून तरी  हे सरकार समाजातील नक्की कोणत्या वर्गाला प्राधान्य देते हे अधोरेखीत होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या म्हणजेच (झोपू) योजनेच्या अंतर्गत तुम्हांला घरे मिळवून देण्यासाठी आम्ही जातीने लक्ष घालून त्याचा पाठपुरवठा करू आणि गरज पडली तर आंदोलन देखिल करू. झोप़पट्टीबाबत त्वरीत पाऊले उचलावीत अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन छेडेल असा ईशारा देखील त्यांनी यावेळी दिला.