कॉसमॉस हल्ला प्रकरणात अजमेरा कनेक्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉसमॉस बँकेच्या सर्वरवर हल्ला करून 94 कोटी रुपये लुटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या एसआयटीने मुंब्र्यातील आणखी दोघांना अटक केली आहे. या दोघांनी आतापर्यंत अटक केलेल्या इतर आरोपींप्रमाणेच 10 बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून 7 लाख 50 हजार रुपये अजमेर येथून काढल्याचे तपासात समोर आले आहे.

रफिक जलाल अन्सारी (34), अब्दूल्ला अफसर अली शेख (28, दोघेही रा. शॉप नं 4 स्टँडस्टोन सोसायटी, मीरा रोड, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कॉसमॉस बँकेचे बँकेच्या सर्ववर हॅकरने हल्ला करून 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान 94 कोटी 42 लाखांची रोकड वेगवेळ्या मार्गांनी काढण्यात आली होती. त्यापैकी 413 बनावट डेबीट कार्डच्या माध्यमातून 2 हजार 800 करून अडीच कोटीची रोकड देशातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. तर 12 हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे करण्यात आले होते.

या गुन्हयाचा तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. मुंबई, इंदुर, कोल्हापूर, अजमेर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीक रणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. यापुर्वी अशाच प्रकारे कोल्हापूर, मुंबईतून पैसे काढणार्‍या सात जणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी दोघांना मीरा रोड येथू अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दोघेही मीरा रोड येथे एका गॅरेजमध्ये दुचाकी रिपेअरींगचे काम करतात. त्यांनी हल्ल्याच्या दिवशी अजमेर येथील एटीएममधून 10 एटीएम कार्डच्या मदतीने साडेसात लाख रुपयांची रोकड काढली असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.