CM ठाकरेंचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंटमध्ये खरेदी केला 5.3 कोटींचा आलिशान फ्लॅट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता (principal advisor to CM Ajoy Mehta) यांनी मुंबईतील प्रतिष्ठित अशा नरीमन पॉइंट परिसरात आलिशान फ्लॅट खरेदी (bought-flat-worth-rs-53-crore-nariman-point) केला आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 5.3 कोटी रुपये आहे. मेहता यांनी स्वत: या वृत्ताचे समर्थन केले आहे.

मंत्रालयाजवळील जनरल जग्गनाथ भोसले मार्ग येथील समता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 5 व्या मजल्यावर मेहता यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅटचे चटई क्षेत्र तब्बल 1,076 स्वेअर फूट इतके आहे. फ्लॅटसोबतच या इमारतीमध्ये मेहता यांना दोन कार पार्किंगसाठी जागा मिळाली आहे. सर्व व्यवहार बाजारमूल्यानुसार झाले असून, याबाबतची सर्व कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटचा बाजारभाव 5.3 कोटी इतका आहे. यासंबंधीचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केले आहे.

मेहता यांनी या व्यवहारात 2.76 कोटी रुपये नेटबँकिंग आरटीजीएस केले आहेत. 2.5 कोटी रुपये हे आगाऊ धनादेशाने दिले आहेत, तर 3.97 लाख रुपयांचा टॅक्स भरला आहे. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, फ्लॅटची 10.68 लाख इतकी स्टॅम्प ड्यूटी विक्रेत्याने भरली आहे. अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा फ्लॅट 2009 साली आशिष मनोहर यांच्याकडून 4 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

मेहता हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, मे 2019 मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली होती. याआधी त्यांनी चार वर्षे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती. सप्टेंबर 2019 मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना 6 महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर कोविड काळामुळे त्यांना पुन्हा एकदा 3 महिन्यांची वाढीव मुदत मिळाली. ते 30 जून रोजी निवृत्त झाले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहात आहेत.