पोलिसांनी आमदाराच्या घरी केलेल्या छापेमारीत आढळली AK-47 रायफल, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील बाहुबली आणि अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरी पोलिसांनी आज छापेमारी केली. छापेमारीत एके-४७ रायफल आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. आमदाराच्या घरात एके-४७ रायफल मिळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या लदमा गावातील घरावर पटणा ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकला होता. छापेमारीत दोन बॉम्ब देखील जप्त करण्यात आले आहेत. अनंत सिंह यांच्यावर खून आणि खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे यापुर्वीच दाखल आहेत.

बाहुबली आमदार अनंत सिंह गेल्या काही दिवसांपासुन पोलिसांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपुर्वी अनंत सिंह यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते एकाच्या खूनाचा कट रचत होते. याच प्रकरणी गेल्या आठवड्यात पोलिसांनी अनंत सिंह यांच्या आवाजाचे नमुने तपासणी करीता घेतले होते. गेल्या काही दिवसांपासुन पोलिस अनंत सिंह यांच्या लहान-सहान हालचालींवर वॉच ठेवुन आहे. पोलिसांना अनंत सिंह यांच्या घरी घातक हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ३ वाजता अनंत सिंह यांच्या गावातील घरावर छापेमारी सुरू केली. त्यामध्ये एके-४७ रायफल आणि इतर घातक हत्यारे आढळून आली आहेत.

दरम्यान, अनंत सिंह यांनी पत्रकार परिषद घेवून जेडीयुचे खासदार ललन सिंह यांच्यावर घणाघाती आरोपी केले आहेत. त्यांनीच आपल्याला फसवल्याचे देखील अनंत सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –