NDA मध्ये खरंच राम उरला आहे काय ? : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि अकाली दल कायम भाजपबरोबर राहिले आहेत. ‘सत्ता आली, सत्ता गेली पण प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार भाजपची साथ सोडून गेले पण शिवसेना आणि अकाली दल यांनी भाजपची साथ सोडली नाही. पण आताच्या घडीला या दोन्ही पक्षांनी ‘ एनडीए’ ला राम राम ठोकला आहे. त्यामुळं एनडीएत खरंच राम उरला आहे काय?,’ असा खोचक टोला शिवसेनेकडून भाजपला लगवण्यात आला आहे. अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांवरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरसुद्धा मोदी सरकारने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मग अखेर अकाली दलाकडून एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेनंतर आता अकाली दलाने सुद्धा भाजपची साथ सोडली आहे. हे दोन्ही पक्ष भाजपचे सर्वात जुने मित्र पक्ष होते. आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्यामुळे आता राष्ट्रीय राजकारण बेचव झालं आहे. असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आधी शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आणि आता अकाली दलाने सुद्धा साथ सोडली आहे. त्यामुळे एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच.आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत.त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी म्हणावी लागेल, असा चिमटा शिवसेनेकडून काढण्यात आला आहे.

ज्या कारणामुळे ‘एनडीएची स्थापना करण्यात आली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले आहे. अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांब होता तो सुद्धा आता सोडून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारण निस्तेज होताना दिसत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यात आल्या. अनेक राज्यांत भाजपची सत्ता आहे,जिकडे अल्पमत होते तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळवण्यात आली. केंद्रातील सत्ता हाती असली कि काहीच अशक्य नसते. एनडीएने आपले सत्तेचे गड राखले असले तरी तो सिंहसुद्धा गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार ? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे.