“पाकिस्तानला कुणी 1 शिवी दिली, तर मी त्याला 10 शिव्या देईन”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी येथून दहा शिव्या देईन असे वादग्रस्त वक्तव्य जम्मू काश्मीरचे नॅशनल काॅन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. अशातच नेत्यांची अनेक वादग्रस्त विधाने समोर येतात.

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सभेत मोहम्मद अकबर लोन बोलत होते. यावेळी बोलताना त्यांचे पाकिस्तानवरील प्रेम उफाळून येताना दिसले. यावेळी बोलताना मोहम्मद अकबर लोन म्हणाले की, “जर पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी येथून दहा शिव्या देईल.” एवढेच बोलून लोन थांबले नाहीत. पाकिस्तानचे गोडवे गाताना ते पुढे म्हणाले की, “माझ्या पलीकडे असणारा देश मुसलमानांचा देश आहे. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची दोस्ती वाढावी. त्या दोस्तीचा मी आशिक आहे. पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी” अशी विधाने करत अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

अकबर लोन यांनी केलल्या वक्तव्यार नेटीझन्सने मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला आहे. अकबर लोन यांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. लोकसभा निवडणुकीत पाकिस्तान मुद्दा प्रचारासाठी वापरला जात आहे.

पाकिस्तानबद्दल प्रेम व्यक्त करण्याची ही लोन यांची काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जम्मू काश्मीरच्या विधानसभेत लोन यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. जम्मू काश्मीर विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजपाचे काही आमदार सभागृहात पाकिस्तान विरोधी घोषणा देत असताना अकबर लोन यांनी पाकिस्तानच जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यावेळीही त्यांच्या या घोषणेमुळे वाद उफाळून आला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जम्मू काश्मीरच्या 6 जागांपैकी 5 जागांवर मतदान होणार आहे. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स आणि काँग्रेस पार्टीची आघाडी झाली आहे. अनंतनाग, बारामुला आणि लडाख याठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल काॅन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. जम्मू आणि उधमपूर या जागेवरून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे तर श्रीनगरमधून नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला हे निवडणूक लढवणार आहेत.