Pune News : माझ्यासाठी हा मोठा सन्मान, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीनंतर डॉ. जयंत नारळीकरांची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर डॉ. जयंत नारळीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत नारळीकर म्हणाले, माझ्यासाठी हा मोठा सन्मान असून, त्यासाठी आपण योग्य ठरु यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मराठी टिकून राहवीयासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत. माझ्या कार्यकाळात मी त्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. नारळीकर यांनी सांगितले.

डॉ. जयंत नारळीकर पुढे म्हणाले, मराठी भाषा अलीकडच्या काळात टिकून राहिली पाहिजे. त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती व्हावी म्हणून, नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी प्रयत्न करणार असून, विज्ञान मराठीत आले की भाषा अधिक समृद्ध होईल. वैज्ञानिक आणि साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. ते एका मराठी वृत्तपत्राशी संवाद साधत होते.

देशात प्रथमच एका शास्त्रज्ञाला एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला असावा. आकाशाशी जडले नाते, व्हायरस, माझे विश्व, अंतराळ आणि विज्ञान इत्यादी साहित्यिक लिखाण डॉ. जयंत नारळीकर यांनी केलेले आहे. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.