तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी ; हिंदू महासभेची कमल हसन यांना धमकी

मेरठ : वृत्तसंस्था – नथुराम गोडसे हा देशातील पहिला हिंदू दहशतवादी असल्याचे वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केल्याने त्यावर आता राजकारण सुरु झाले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी मेरठमध्ये सांगितले की, कमल हसन यांना महात्मा गांधी यांच्याकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल, अशी धमकी दिली आहे. तामिळनाडूतील मंत्री टी राजेंद्र यांनी कमल हसनची जीभ छाटली पाहिजे, असे सांगत त्याचा निषेध केला आहे.

तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता, असे विधान केले होते. त्यावर हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारे कमल हसन, फारुख अब्दुला, नवज्योत सिंग सिद्धू आणि मेहबुबा मुफ्तीसारखे लोक आहे. जे दहशतवाद्यांचे रक्षण करतात.

तसेच सवंग लोकप्रियतेसाठी नथुराम गोडसे यांचे नाव दहशतवादासोबत जोडण्याचे काम केले. त्यामुळे हसन यांच्या हत्येसाठी ते स्वत: जबाबदार असतील. कमल हसन यांना गांधीकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक आहेत अशी त्यांनी टीका केली. एआयडीएमकेचे तामिळनाडुमधील मंत्री टी. राजेंद्र यांनी कमल हसन यांच्या विधानाचा निषेध करीत त्यांची जीभ छाटली पाहिजे, असे सांगितले.