अखिलेश काँग्रेससोबत तर मायावतींचे पत्ते ‘गुलदस्त्यात’

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यास अजून २ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. काल आलेल्या एक्झिट पोलमध्ये जरी पुन्हा भाजप सत्तेवर येणार असल्याचे दिसत असले तरी विरोधकांनी मात्र आपल्या परीने जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून आज सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होत आहे.

या बैठकीला सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हजर राहणार असले तरी समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष्या मायावती मात्र या बैठकीला जाणार नसल्याचे समजत आहे. तर त्याच बाजूला मायावती यांच्याबरोबर उत्तर प्रदेशात आघाडीत असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मात्र निकालानंतर गरज पडल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं जाहीर केलं आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी जोरदार प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कर्नाटक पॅटर्नच्या धर्तीवर सरकार बनवण्याची तयारी देखील विरोधी पक्षांनी चालू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे आज मायावती यांची भेट घेणार होते. त्यासाठी मायावती लखनऊहून दिल्लीला येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र अशी कोणतीही भेट घेणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर २३ मे नंतर मायावती कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.