मोदींचे वादळ थांबवण्यासाठी मायावती-अखिलेश यांची हातमिळवणी 

लखनऊ : वृत्तसंस्था – देशात 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकींना काही महिन्यांच्या कालावधी असताना राजकिय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती. त्यामुळे 2019मध्ये मोदींची ही लाट अडवण्यासाठी सर्वत्र मोठ्या पक्षांच्या आघाडीसाठी चर्चा होत आहेत. त्याच मार्गावर उत्तर प्रदेशमधील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्णायक घडामोडी होताना दिसत आहेत.
2014 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विरोधकांना पाणी पाजलं होतं.

तेव्हा उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी भाजप आणि मित्रपक्ष अपना दलने मिळून 73 जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच, तर काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता. त्यामुळे याच पार्श्वभूमिवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने सावधगिरी बाळगली आहे. यावेळी दोन्ही पक्ष भाजपला नमवण्यासाठी एकत्र येत आहेत. शनिवारी या युतीची  अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्‍यता आहे.

बसपच्या नेत्या मायावती आणि सपचे नेते अखिलेश यादव यांच्यात गेल्या महिन्यातच जागावाटपाची चर्चा झाली होती. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मायवती यांनी अखिलेश यादव यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. ‘ही एका नव्या आघाडीची नांदी आहे’, अशी प्रतिक्रिया अखिलेश यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

जागावाटपाच्या चर्चेनंतर आता बसप आणि सप या दोन्ही पक्षांच्या सचिवांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शनिवारी पत्रकार परिषद होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही या पत्रकार परिषदेस उपस्थित असतील. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्ष प्रत्येकी 37 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर राहिलेल्या जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. या मित्रपक्षांमध्ये या दोन्ही पक्षांनी काँग्रेसचाही समावेश केला आहे.

दरम्यान, मोदींच वादळ अडवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. मात्र आता यांची युती भाजपवर कितपत भारी पडणार हे निवडणुकीनंतर त्यांचे निकालच सांगेल.