‘चायनीय’ टेस्ट किटवरून अखिलेश यादवांचा मोदी सरकारवान ‘नेम’

लखनऊ : वृत्त संस्था – चीनहून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किट संबधी काही प्रश्न उपस्थित करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदी सरकार वरती टीका केलीय. इतक्या कठीण प्रसंगात कोणत्याही गुणवत्ता चाचणीशिवाय या किटचा वापर करणे म्हणजे जनतेसोबत विश्वासघात आहे, असं म्हणतं त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, कोरोना संसर्ग विरुद्ध लढ्यात मरण पत्करणाऱ्या ‘योद्ध्यां’ ना ‘शहिदांचा’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणी देखील अखिलेश यादव यांनी केली.

अखिलेश यादव यांनी बुधवारी यासंदर्भात दोन ट्विट केले आहे. पहिल्या ट्विटमध्ये अखिलेश यांनी चीनहून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किट गुणवत्ता चाचणी शिवाय वापरात आणण्यावरून मोदी सरकारला घेरलं. ‘चूक लक्षात आल्यानंतर आता टेस्ट स्थगिती करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) या संदर्भात या आधीच इशारा देणं गरजेचं होतं. इतका मोठा बेजबाबदारपणा केल्यामुळे सरकारनं तत्काळ स्पष्टीकरण द्यावं. तसेच अगोदर ज्या चाचण्या या टेस्ट किटच्या साहाय्यानं करण्यात आले त्यांचे निकाल किती अचूक होते, हे देखील सांगावं असंही त्यांनी म्हटलं.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अखिलेश यांनी कोरोना संसर्ग विरुद्ध लढ्यात मरण पत्करणाऱ्या ‘योद्ध्यां’ ना ‘शहीद’ चा दर्जा देण्याची मागणी केली. ‘सरकारकडे आमची मागणी आहे की कोरोना संसर्गावर उपचार करताना, मानवतेच्या सेवेत आपलं कर्तव्य बजवणाऱ्या आणि स्वतःच कोरोना संसर्गाला बळी पडणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचारी, पोलीस किंवा इतर कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा’ असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं.

उल्लेखनीय बाब म्हणजे, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना संसर्ग लढाईत मृत्यू झालेल्या योद्ध्यांना शहिदाचा दर्जा देण्याची घोषणा केली. तसेच त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाईल. तसेच कोरोना संसर्ग योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेतानाच त्यांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याची तरतूद देखील राज्य सरकारने केली आहे. शहीद झालेल्या योद्ध्यांच्या कुटुंबियांना रिटायरमेंट कालावधीपर्यंत संपूर्ण पगार देण्याचा निर्णयही ओडिशा सरकारनं जाहीर केलाय.