अकलूजमध्ये मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील गटाला धक्का बसला आहे. प्रभाग तीन मध्ये मोहिते- पाटील विरुद्ध माने- पाटील लढतीत विजयसिंह मोहिते- पाटील यांचे पुतणे व ज्येष्ठ नेते जयसिंह उर्फ बाळदादा यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव झाला आहे.

१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रतापसिंह मोहिते- पाटील विकास पॅनेलच्या उर्वशीराजे धवलसिंह मोहिते- पाटील या बिनविरुद्ध झाल्या. त्यामुळे १६ जागांसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील व विजयसिंह मोहिते- पाटील विकास पॅनेलचे १६, प्रतापसिंह मोहिते- पाटील विकास पॅनलचे १६ आणि अपक्ष १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दोन्ही पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली होती.

मोहिते- पाटील यांनी विरोधी पक्षाचे डिपॉझिट जप्त करण्याचे मतदारांना आवाहन केले होते. तर डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी अकलूजची सत्ता आमच्या ताब्यात द्या, विकास काय असतो ते दाखवून देऊ, असे आवाहन केले होते.

दरम्यान, माजी सरपंच संग्रामसिंह जयसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव झाल्याने मोहिते- पाटील कुटूंबीयांना मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १४ जागांवर सहकारमहर्षीं शंकरराव मोहिते- पाटील गटातील उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रतापसिंह मोहिते- पाटील गटाच्या तीन उमेदवारांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला आहे. संग्रामसिंह यांच्या पराभवाला त्यांचा जनसंपर्क चांगला नसल्याचे कारण सांगितले जाते.