‘बेपत्ता’ मुलीच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांची तडकाफडकी बदली, दोन अधिकार्‍यांचं थेट ‘निलंबन’, गृहमंत्र्यांची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अकोल्यातील बेपत्ता मुलीच्या संदर्भात तक्रारीची दखल न घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तर अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात आज अधिवेशनात आदेश दिले. ज्या ठिकाणी महिला अत्याचारांच्या घटना होतील अशा ठिकाणी महिलांच्या तक्रारी घेतल्या नाहीतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.

महिलांवर अत्याचाराच्या घटना किंवा झाल्यानंतर त्यांना वागणूक चांगली मिळत नाही. याबाबत अकोल्यामध्ये किरण ठाकूर यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणात योग्य तपास न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी भानुप्रताप मडावी, महिला अधिकारी कराळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांकडून तक्रारदाराला धमक्या
तक्रारदार किरण ठाकूर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले की, माझी मुलगी सहा महिन्यापासून बेपत्ता आहे. त्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो. मात्र, पोलीस कोणतीही दखल घेत नव्हते. अखेर मी नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. तुम्ही कोर्टात का गेले ? मीडियामध्ये का गेले ? आता आम्ही तपास करणार नाही. तसेच मुलीच्या तपासाची मागणी केल्यानंतर हाकलून देण्यात आले. त्यानंतर आज मी गृहमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केल्याचे किरण ठाकूर यांनी सांगितले.