अकोला : 15 वर्षीय मुलाचा सकाळी तर आईचा मृतदेह रात्री सापडला, सर्वत्र खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेने आपल्या 15 वर्षीय मुलासह नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केली. बाळापूर शहरात बुधवारी (दि. 14) ही घटना घडली. त्याच दिवशी मुलाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. तर दुस-या दिवशी आईचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर मृत महिलेच्या पतीने पोलीस ठाणे गाठत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रसाद प्रकाश चितरंग (वय 15) आणि मनिषा प्रकाश चितरंग असे मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर जवळील मन नदीपात्रात प्रसादचा मृतदेह आढळला होता. यानंतर बाळापूर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुराकडे चौकशी केल्यानंतर दोघांनी नदीपात्रात उडी घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी आपत्तकालीन पथकाद्वारे नदीपात्रात दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मृत प्रसादच्या मामाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची बहीण मनिषा हिचा विवाह बाळापूर, अकोला येथील रहिवासी प्रकाश चितरंग यांच्यासोबत झाला होता. त्यांना प्रसाद हा एकुलता एक मुलगा होता. तर बहीण मनिषा ही आरोग्य विभागात नोकरीला होती. जावई प्रकाश चितरंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर तिने काही दिवसांपूर्वी त्याच विभागातील दुस-या व्यक्तीबरोबर विवाह केला होता. बुधवारी प्रसादचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बेपत्ता असलेल्या मनिषाचाही गुरुवारी मृतदेह आढळून आला. दरम्यान मनिषाच्या पतीने बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन विषप्राशन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी त्याला उपचारासाठी बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. बाळापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.