बनावट संदर्भाच्या आधारे दाखला अकोलकर यांचा जिल्हा न्यायालयात अर्ज

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- माझ्या बनावट संदर्भाचा आधार घेऊन न्यायालयात बनावट दाखला सादर केला आहे. त्याबाबत सखोल चौकशी करून व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज डॉ. नानासाहेब अकोलकर यांनी नगरच्या न्यायालयात केला आहे.

नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्या तिसर्‍या अपत्याच्या जन्मतारखेवरुन अर्जुन बोरुडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात डॉ. अकोलकर यांच्याकडून दाखला देण्यात आल्याची कागदपत्रे सादर झालेली आहेत. हा दाखला खोटा असल्यादा दावा वाकळे यांना केला आहे. मुलाचा जन्म वाळकीत झाल्याची कागदपत्रे पत्रकारपरिषदेत दिली. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे.

आज डॉ. अकोलकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या हॉस्पिटलमधून सरला बाबासाहेब वाकळे या महिलेच्या मुलाचा जन्म १० ऑक्टोबर २००१ रोजी झाल्याचे १२ एप्रिल २०१८ रोजीचे प्रीस्क्रीप्शन १४ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या कार्यालयात दाखविले. त्याआधारे त्याच मजकुराचे परंतु, सावेडीतील रहिवासी पत्ता दाखविणारे जन्म प्रमाणपत्र काही  लोकांनी माझ्याकडे मागितले. त्यांना मनपात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, ते माझ्याकडील प्रीस्क्रीप्शन घेऊन निघून गेले. त्यानंतर १९ डिसेंबर २०१८ रोजी सदरील व्यक्तींनी माझ्या कार्यालयात येवून माझ्या पत्नी सुनीता अकोलकर यांचेकडे दुरुस्ती करुन मागितली. मात्र, त्याला नकार देण्यात आला.

त्यानंतर २१ डिसेंबर २०१८ रोजी अर्जुन बोरुडे याने भाजप नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्या तिसर्‍या अपत्याबाबत न्यायालयात तक्रार केल्याचे समजले. त्यात माझ्या हॉस्पिटलचा व मी दिलेला दाखला आहे, असा उल्लेख असल्याने त्याच्या प्रती मिळविण्यासाठी  अर्ज केलेला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय बदनाम करणार्‍या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मी स्वतंत्रपणे तक्रार करणार आहे. मात्र, जिल्हा न्यायालयात माझ्या बनावट संदर्भाचा आधार घेऊन दाखल झालेल्या प्रकरणाची चौकशी होऊन व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी  केली आहे.

ब्लॅकमेलिंग कोण करतेय, हे जनतेला माहिती: बोरुडे

आम्ही जागा बळकावल्या नाहीत, कोणाला दमदाटी केली नाही, पैशाची मागणीही केलेली नाही. ब्लॅकमेलिंग कोण करतेय? हे सर्व जनतेला माहीत आहे, असे प्रत्त्युत्तर अर्जुन बोरूडे यांनी नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्या आरोपाला  दिले आहे.