अकोले मतदारसंघ : किरण लहामटेंच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ

अकोले, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी कट्टर पिचड विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ.किरण लहामटे यांना जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या उदारमतवादामुळे उमेदवारीची माळ डॉ.किरण लहामटेंच्या गळ्यात पडली आहे.

अकोले विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी सुनीता भांगरे व डॉ.किरण लहामटे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे दोघांचे ही कार्यकर्ते उमेदवारी आम्हालाच मिळणार आहे, अशी सोशल मिडियातून वलग्ना करीत होते. मात्र अकोले तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ.किरण लहामटेंच्या उमेदवारीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले.

डॉ.लहामटे यांना उमेदवारी जाहीर होताच डॉ.लहामटे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. डॉ.लहामटे हे गुरुवार दि.3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज अकोले तहसील कार्यालयात दाखल करणार आहेत. जुन्नर येथील शिवरायांच्या समाधीचे दर्शन व शिवाई मातेचा आशीर्वाद घेऊन डॉ.किरण लहामटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

दरम्यान डॉ.लहामटेंना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अशोकराव भांगरे यांनी दाखविलेल्या मोठेपणा बद्दल अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे. जर वैभव पिचड व डॉ.किरण लहामटे यांच्यात सरळ लढत झाली, तर ही निवडणूक पिचड यांच्यासाठी जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ.किरण लहामटे यांचा तरुण वर्ग मोठा चाहता आहे. त्यामुळे निवडणुकीचे खरे चित्र मत मोजणी दरम्यानच स्पष्ट होणार आहे.

Visit : policenama.com