अकोट : तेजसचा मृत्यू संशयास्पद, स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी

अकोट  : पोलीसनामा ऑनलाइन –   अकोट तालुक्यातील पनज येथे 29 मे रोजी तेजस या तरुणाचा मृत्यू झाला होता. तेजसचा मृत्यू हा संशयास्पद नसून त्याचा खुन झाला असल्याचा संशय तेजसच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच त्यांनी अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देखील दिले असून त्याच्या मृत्यूची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तेजस जीवनवाल याला 29 मे 2020 रोजी गावातील गणेश गजानन बोचे याने घरून बोलावून त्याला सायकल वरून सोबत नेले. दीड तास झाले तरी तेजस घरी परतला नाही. त्याचा नातेवाईकांनी शोधा घेतला. तसेच त्यांच्या मोबाइलवर गणेश बोचे मिस कॉल होता. दुपारी २ वाजेपर्यंत घरी तेजस न परतल्यानंतर तेजसची बहीण पूनम हिने व्हाट्स आपच्या द्वारे गणेश बोचे यास माझा “भाऊ तुझ्या सोबत आहे का” असा संदेश पाठवला.मात्र गणेश बोचे ह्याने कुठलाही रिप्लाय दिला नाही. रात्री दहा पर्यंत गणेशशी संपर्क झाला नाही म्हणून आकोट पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.

दरम्यान पहाटे साडेपाच वाजता मुकेश गुप्ता हे गावातील बोचरा शिवारात राजू बारीकसा गडेकर यांच्या शेतातील बंद पडलेल्या विहिरी जवळ तेजस याची सायकल असल्याची माहिती संजय साविकर यांना कॉल करून दिली. तेजस हा पाण्यात बुडून मरण पावल्याचे व गणेश हा जिवंत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली त्या वेळी गणेश हा पाईपला धरून उभा होता.त्यास विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गणेश हा गुप्त धन शोधणाऱ्या टोळीच्या संपर्कात असल्याचे तेजस यांचे वडील राजू जीवनवाल यांनी ग्रामस्थांनच्या सांगण्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान आकोट ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली असता गणेश याने गुन्हा कबूल केला असल्याचा आरोप राजेश जीवनवाल यांनी केला आहे. पण ग्रामीण पोलीस स्टेशन आकोटमध्ये कुठलीच कार्यवाही केली नसल्याचे म्हणणे तेजसच्या वडिलांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याने मृत्यूचा तपास स्थानिक गुन्हे शाखा कडून करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.