गुडवीन ज्वेलर्सच्या बंधूंकडे आढळली 50 कोटींची मालमत्ता

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील सुमारे 1200 गुंतवणूकदारांची 25 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्सच्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांची केरळसह इतर ठिकाणी 50 कोटींच्या 21 मालमत्ता आढळल्या आहेत. अकराकरण बंधूची बहुतांश मालमत्ता जप्त केली असून वर्षभरात त्याचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

अकराकरण बंधूंची आढळलेली मालमत्ता –
केरळमधे त्यांची एक तीन मजली इमारत आहे. याशिवाय अलिशान मॉल, सुमारे 90 एकर जमीन, बंगले, रिसॉर्ट अशा 40 ते 50 कोटींच्या 21 मालमत्ता आढळल्या आहेत. यातील अनेक मालमत्तांची त्यांच्याच नातेवाईकांच्या मदतीने खातरजमा केल्यानंतर त्या सीलबंद केल्या आहेत. यामध्ये दोन मर्सिडीज कारसह फॉर्च्युनर, इनोव्हा अशा दिड ते दोन कोटीच्या दहा कारचा समावेश आहे. बँकेत दीड कोटींची रक्कम आढळली असून ती खातीही गोठविली आहेत.

1154 गुंतवणूकदारांची फसवणूक –
ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील मानपाडे, अंबरनाथच्या शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांमध्ये 1154 गुंतवणूकदारांची त्यांनी 25 कोटींची फसवणूक केल्याचे आढळले. मात्र, पालघर, नवी मुंबई, पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे ग्रामीण अशा विविध ठिकाणीही या ज्वेलर्सने तीन ते चार हजार गुंतवणूकदारांची 90 कोटींपेक्षा अधिक फसवणूक केली असल्याचे सांगण्यात येते.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, नितीन ठाकरे, पोलीस निरिक्षक अशोक उतेकर, शंकर चिंदरकर आणि वनीता पाटील आदींचा समावेश आहे. फसवणुकीनंतर अकराकरण बंधूंनी केरळातील त्रिशूर जिल्ह्यात जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदीमध्ये मोठी गुंतवणूक केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/