अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ला लंडनच्या ‘रेम्बो’ महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तरुणाचे भावविश्व मांडणाऱ्या अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या चित्रपटाला लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
करोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल. त्रिज्या चित्रपटात २५ वर्षांच्या तरुणाचे भावविश्व मांडण्यात आले आहे. या चित्रपटाने ‘एशियन न्यू टॅलेंट’, ‘ब्लॅक नाईट्स फिल्म फेस्टिव्हल’, आणि बांग्लादेश येथील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्वित्झर्लंड येथील चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाची दखल घेतली जाणे ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी व्यक्त केली.

या आधी चीन देशात संपन्न झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या अतिशय मानच्या समजल्या जाणाऱ्या फेस्टिवलमध्ये ‘त्रिज्या’ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी जगातल्या अतिशय नामांकित अशा ‘द हॉलिवूड रिपोर्टर’ या ८८ वर्ष जुन्या आणि ‘स्क्रीन इंटरनॅशनल’ या १२२ वर्ष जुन्या मासिकात त्रिज्याचे वेगळेपण दर्शविणारे परिक्षणात्मक लेख झळकले. त्रिज्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टॅलिनमध्ये जगभरातून आलेल्या विविध भाषांमधल्या, विविध देशांमधल्या हजारो सिनेमांमधून ‘त्रिज्या’ या एकमेव व पहिल्या मराठी चित्रपटची निवड ही मराठी चित्रपटाच्या इतिहासातील विलक्षण अशी घटना आहे. मराठी चित्रपटासाठी व सिनेरसिकांसाठीही ही बाब नक्कीच कौतुकाची ठरणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारलेल्या मराठीतल्या पहिल्या Docu-Fiction सिनेमामुळे अक्षय इंडीकर यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच या सिनेमाचा वेगळा बाज अनेकांच्या पसंतीसही उतरला होता. त्यामुळे अक्षय इंडीकर यांच्या आगामी सिनेमाची वाट अनेक सिनेरसिक अवर्जुन पाहात होते. कान्स येथे झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये ‘त्रिज्या’चा ट्रेलर दाखविण्यात आला होता. चित्रकथा निर्मितीचे अरविंद पाखले तसेच फिरता सिनेमा आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्सचे अर्फी लांबा व कॅथरीना झुकाले यांनी ‘त्रिज्या’ या सिनेमाच्या निर्मितीस हातभार लावला. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रोडक्शन हाऊस आहे. भारत आणि जर्मनी या दोन देशांची निर्मिती असलेला त्रिज्या, हा मराठीतला अद्वितीय चित्रपट असणार आहे.