‘खिलाडी’अक्षय कुमारचा भाऊ सचिन कुमार यांचे 44 व्या वर्षी मुंबईत निधन, ‘कहानी घर घर की’ मध्ये केलं होतं काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  स्टारप्लस वरील ‘कहानी घर घरी की’ आणि सोनी टीव्ही वरील शो ‘लज्जा’ मध्ये काम केलेले आणि अभिनेता अक्षयकुमार यांचा भाऊ सचिन कुमार यांचा शुक्रवारी रात्री अंधेरीतील राहत्या घरात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. अभिनेत्याबरोबरच ते चांगले फोटोग्राफरही होते.

एकता कपूरच्या कहानी घर घर की मध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकून फोटोग्राफीवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. सचिन कुमार हे अक्षय कुमार यांचा आतेभाऊ होता. सचिन कुमार यांनी १३ मेला आपला वाढदिवस साजरा केला होता.

सचिन कुमार हे ओबेरॉय स्प्रिंग येथे रहात होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सचिन झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी अनेकदा त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजविल्यानंतरही त्यांनी उघडला नाही. तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी खोलीची चावी शोधून दरवाजा उघडला, तेव्हा सचिन हे बिछान्यावर मृतावस्थेत आढळून आले. त्यांना झोपेतच ह्दयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले. अक्षय यांना सचिन यांच्या निधनाचे वृत्त समजताच ते तातडीने त्यांच्या घरी गेले व त्याच्या आईवडिलांचे सांत्वन केले.