वादात सापडलेल्या अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं, चित्रपट निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : अक्षय कुमारचा नवीन चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा वाद शांत करण्यासाठी आता या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या चित्रपटाच्या टायटलमधून बॉम्ब हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. चित्रपटाचे नवीन नाव ‘लक्ष्मी’ (Laxmii) असे असेल. लक्ष्मी हा चित्रपट 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटाला गुरुवारी सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी पाठविण्यात आले होते. स्क्रिनिंगनंतर फिल्म मेकर्स आणि सीबीएफसी (CBFC) यांच्यात चित्रपटासंदर्भात चर्चा झाली. लोकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपटाचे निर्माते- शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच हा चित्रपट वादात सापडला होता. ट्रेलर रिलीज होताच अनेक ट्विटर यूजर्सनी यावर ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्याचा आरोप केला होता.

तथापि, चित्रपटाच्या ट्रेलरचं लोकांनी कौतुकही केलं, आमिर खान यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘प्रिय अक्षय कुमार, खूपच गजब ट्रेलर आहे, माझ्या मित्रा. हा चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. हा सिनेमा खूपच हिट होईल ! हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज व्हायला हवा होता. तुझा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. सर्वांना शुभेच्छा.’

You might also like