‘आध्यात्मा’चे धडे देणार्‍या महाराजाकडून विद्यार्थ्याला ‘बेदम’ मारहाण, मुलगा ‘कोमात’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजानेच बेदम मारहाण केलेला विद्यार्थी कोमात गेला असून प्रकुर्ती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना देवाच्या आळंदीत येथे घडली आहे.
या प्रकरणी विद्यार्थीच्या आईने फिर्याद दिली असून महाराज भगवान पोव्हणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेतील हा महाराज आहे.

भगवान पोव्हणे याने 10 फेब्रुवारीला अकरा वर्षीय ओम चौधरीला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याचा जाब विचारला आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्याने ओम चौधरीच्या हात, पाय, पाठ आणि छातीवर काठीने प्रहार केला. छातीवरील काठी ही थेट हृदयावर लागली होती. तेव्हा ओमने ती कळ सहन केली, तशाच अवस्थेत भगवान महाराज त्याला औरंगाबादला घेऊन गेला. पण तिथे ओम बेशुद्ध पडला, याची माहिती मुलाच्या आईला देताना तो आजारी असल्याचं महाराजाने थाप मारली. तिथून त्याला पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात आणलं गेलं.

ओमची आई त्याच रुग्णालयात साफसफाईचं काम करते, त्यामुळे कमी खर्चात इथेच उपचार होईल अशी त्यांची धारणा होती. 12 फेब्रुवारीच्या रात्री ओमवर तातडीने उपचार सुरु झाले, मात्र तो कोमात गेला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अन् तब्बल सात दिवसांनी म्हणजेच 19 फेब्रुवारीला तो शुद्धीत आला. जीवदान मिळालेल्या ओमने घडला प्रकार आईला सांगितला आणि ही धक्कादायक बाब समोर आली.

ओमच्या छातीत पाणी झाल्याचं, तसेच रक्तस्त्राव होण्याची चिन्ह ही आहेत. याप्रकरणी महाराजावर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महाराजाच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहे. ओमची मात्र प्रकृती अद्याप ही चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्याला पिंपरीतील डॉ डी वाय पाटील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

You might also like