केडगावच्या चायनीज सेंटरमध्ये दारुड्यांचा हैदोस

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे केडगाव – हंडाळवाडी रस्त्यावर असणाऱ्या काही चायनीज सेंटरमध्ये दारू पिऊन मोठ्या आवाजात गाणी वाजवत धिंगाणा घालण्याचा प्रकार सुरू असून या दररोजच्या प्रकारामुळे येथील नागरिक त्रस्त बनले आहेत. त्यामुळे या तळीरामांचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होत  आहे.

केडगाव स्टेशन-हंडाळवाडी हा रस्ता कायम रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर असणाऱ्या काही चायनीज सेंटरमध्ये सोळा ते पंचवीस वयोमान असणाऱ्या तरुणांकडून बाहेरून बिअर, दारू आणून या ठिकाणी दारू पार्टी केली जात आहे. या पार्टीमध्ये दारू पिऊन मोठ्या आवाजात गाणी वाजून  धिंगाणा घातला जातो. हा प्रकार नित्याचाच झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, मुलींसह नागरिकांनाहि आता याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

केडगाव स्टेशन हि तालुक्यातील मुख्य आणि मोठी बाजार पेठ म्हणून तिचा नावलौकिक आहे. या ठिकाणी  जवळच्या १५ ते २० गावांतील  हजारो नागरिक दररोज आपल्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. हंडाळवाडी केडगाव रस्त्यावरून येणाऱ्या अनेक  नागरिकांसोबत त्यांच्या पत्नी, मुली व इतर महिला असतात अश्यावेळी केडगावच्या ओढ्यालगत रस्त्यावरून जाताना येथे दारू पित बसलेले तळीराम अचानक जोशमध्ये येतात आणि मोठ मोठ्याने आरडाओरड करून हे गाणे लाव, ते गाणे लाव असे म्हणत हातात बिअरच्या बाटल्या घेऊन रस्त्यापर्यंत नाचत येतात या सर्व प्रकाराचा त्रास हा या रस्त्याने ये जा करणाऱ्या महिला, मुली आणि प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. कुणी या तळीरामांना सांगण्याचा प्रयत्न केला तर हे तळीराम हमरीतुमरी येऊन भांडणे करण्यास सुरुवात करतात अशी माहिती येथील नागरिकांकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली जात आहे.

मोठा अनर्थ होण्याची शक्यता..

मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन शुद्ध हरपलेले १६ ते २५ वयोगटातील युवक या ठिकाणी दररोज पाहायला मिळत आहेत. यांना कुणी आवर घालण्याचा प्रयत्नकेल्यास हे युवक थेट भांडणावर येतात त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठे भांडण होऊन ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच अश्या अवैध दारू पिण्यासाठी जागा देणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.