तळीरामांचं भागणार ? तिन्ही क्षेत्रांमध्ये दारू विक्रीस ‘मुभा’, पण…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने लॉकडाउनची मुदत 17 मेपर्यंत घोषणा केली आहे. त्याबरोबरच हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले आहेत. 4 मेपासून सुरू होणार्‍या लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्राांमध्ये मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित हरित, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही निश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रा ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे. लॉकडाउन च्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्रा, 4 मे पासून सुरू होणार्‍या तिसर्‍या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर मद्यविक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. दुसरीकडे लॉकडाउनची घोषणा केल्यापासून देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व राज्यांनी लॉकडाउनची कडक अमलबजावणी केल्यामुळे मद्यपींची दारुसाठी दैना उडाली आहे.