धाकट्या भावानं केला थोरल्याचा चाकूनं भोसकून खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – दारु पिऊन येऊन शिवीगाळ करणार्‍या थोरल्या भावावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन धाकट्याने खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील मायानगर येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अक्षय अरुण कुटापाळे (वय २३) असे खुन झालेल्याचे नाव आहे. राजा पेठ पोलिसांनी त्याचा भाऊ अभिषेक अरुण कुटापाळे याला अटक केली आहे.

अक्षय हा दारु पिऊन येऊन घरातील लोकांना त्रास देत असे. बुधवारी रात्रीही तो असाच दारु पिऊन घरी आला. तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे चिडुन रागाच्या भरात अभिषेक याने चाकूने अक्षयवर वार केले. त्यातच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अभिषेकला ताब्यात घेतले.