Dating app वर मैत्रीची भुरळ, पुण्यात 86 जणांना गंडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडे डेटिंग ॲपवरून मैत्री करण्याचे प्रमाण वाढत असताना त्याचा वापर लूटमार, फसवणूक करण्यासाठी होऊ लागला आहे. त्यामुळे डेटींग ॲपवरील मैत्री धोक्याची ठरत असून गेल्या 2 वर्षापासून अशा तक्रारींची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात डेटिंग अ‍ॅपद्वारे 2019 मध्ये 105 जणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या होत्या. तर गेल्या वर्षी (2020) लॉकडाउनच्या वर्षातही अशा स्वरूपाच्या 86 तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. डेटिंग ॲपवरून फसवणूक करणाऱ्या टोळ्याच कार्यरत आहेत. अशा टोळ्या प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता येथील असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे म्हणाले की, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधागिरी बाळगावी. विविध अ‍ॅपद्वारे तरुण-तरुणींना मैत्रीची भुरळ घातली जात आहे. त्यांचा विश्वास संपादित करून आर्थिक फसवणूक, लूटमारही केली जात आहे. त्यामुळे खासगी, कौटुंबिक माहिती शेअर करू नये. तसेच समुपदेशक शिल्पा तांबे म्हणाल्या की, अलीकडे कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलांना जास्त एकटेपणा जाणवत आहे. नव्या पिढीकडून सोशल मीडियावरील आभासी मैत्रीवर विश्वास ठेवला जातो. समोरच्या व्यक्तीला आपण ओळखू शकतो, असा अतिआत्मविश्वास त्यांना वाटतो. पालकांच्या नकळत घेतले जाणारे हे निर्णय फसवणुकीचे कारण ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.