तज्ज्ञांनी केलं Alert ! लस हा एकमेव उपाय, तातडीने लस घ्या, अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा कहर प्रचंड प्रमाणात झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग वाढत आहे. तर काही ठिकाणी कमी झाला आहे. काही ठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हणता येणार नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास उशीर केला तर विषाणूला नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट होण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने तातडीन लस घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

देशात लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता 18 वर्षावरील सर्वांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र तरी देखील तज्ज्ञांना चिंता जाणवू लागली आहे. जे लोक लस घेत नाहीत, ते स्वत:वर आणि दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय करीत आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई आरपारची आहे असे समजून सर्वांना लढावे लागणार आहे. या महामारीला दोशाबाहेर घालवायचे असेल तर लस हा एकमेव मार्ग आहे. मात्र, जोपर्यंत प्रत्येक युवक आणि ज्येष्ठ नागरिक लस घेत नाहीत तोपर्यंत हे शक्य नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नवीन व्हेरियंटची शक्यता

ग्लेनाईगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे क्लस्टर सीओओ डॉ. मर्विन लियो यांच्या म्हणण्यानुसार कोविड-19 हा अनेक लोकांमध्ये आहे आणि तेथून त्याचा फैलाव होऊ शकतो. मात्र, त्याचवेळी त्याच्याकडे नवीन व्हेरियंट विकसित करण्याची संधी देखील आहे. यातील काही व्हेरियंट लसीचा प्रभाव कमी करु शकतात.

लसीकरण निर्णायक पाऊल

केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्वांना लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. 28 एप्रिल पासून याची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणाची नोंदणी पहिल्याच दिवशी एक कोटींवर पोहचली आहे. त्यात नोंदणीसाठी अद्याप दोन दिवस बाकी आहेत. सरकार आव्हान स्विकारत हे काम करत आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणता येईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे निर्णायक पाऊल ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तो पर्यंत हे शक्य नाही

कॉन्टिनेंटल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रियाज खान यांनी सांगितले, या साथीच्या काळात सर्व लोकांना हर्ड इम्युनिटीच्या स्तरावर आणणं हा लसीकरणाचा मुख्य उद्देश आहे. जोपर्यंत सर्व नागरिक या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवत लस घेत नाहीत, तोपर्यंत हे शक्य नाही. कोरोनाच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तातडीने लस घेणे आवश्यक

एसएलजी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाच्या सल्लागार डॉ. आरती बेल्लारी यांनी सांगितले की, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. जी लस उपलब्ध आहे ती लस तातडीने घेणे गरजेचे आहे. दोन्ही लसींचे परिणाम सिद्ध झाले असून, एक डोस घेतला तरी सध्या पुरेशी सुरक्षा मिळू शकते. लोकांनी लस घेण्यासाठी वर्षभर थांबण्यात काही अर्थ नाही. जेवढे लोक लस घेण्याचे टाळतील तितके विषाणूचे व्हेरियंट म्युटेट वाढण्याचा धोका अधिक आहे.

वैद्यकीय विश्वावर विश्वास ठेवा

अमेरिकेतील डोजसिटी येथील वेस्टर्न प्लेन्स हॉस्पिटलच्या डॉ. अनुषा कारा म्हणाल्या की, लस तातडीने घेण्यावर भर दिला पाहिजे. शास्त्रज्ञांकडे एवढा डेटा जमा झाला आहे की आता लोकांनी लस आणि वैद्यकीय विश्वावर विश्वास ठेवला पाहिजे. येता काळ हा भारत आणि जगभरातील अन्य देशांसाठी निर्णायक ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.