धक्कादायक ! 70 लाख भारतीयांच्या डेबिट- क्रेडिट कार्डचा डेटा लीक, वैयक्तिक माहिती झाली उघड

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणा-या भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील जवळपास 70 लाख भारतीयांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक (data leaked) झाला असून क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहितीही सार्वजनिक झाल्याचे इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर्सने म्हटले आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर, ई-मेल्स, कंपनीचे नाव आणि उत्पन्नाची माहिती असल्याचे सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया (Security researcher Rajasekhar Rajharia) यांनी आयएएनसी बोलताना सांगितले आहे.

एका अहवालानुसार, लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातील माहिती आहे. तसेच हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो आर्थिक बाबीसी संबधित असल्याने हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटले आहे. कारण, पिशिंग किंवा इतर हल्ल्यांसाठी या वैयक्तिक संपर्काचा वापर केला जाऊ शकतो. या डेटामध्ये कार्ड नंबर नसून तो थर्ड पार्टीकडून लीक झाल्याची शक्यता आहे. उदाहर्णार्थ सांगायचे झाल्यास, बँकांसोबत क्रेडिट आणि डेबिट कार्ड देण्यासंदर्भात करार केलेल्या कंपन्यांकडून तो लीक झाला असावा, असेही राजशेखर यांनी म्हटले आहे. सुमारे 5 लाख कार्ड धारकांचा पॅन क्रमांकही या डेटामध्ये लीक झाल्याचे संशोधकानी म्हटले आहे.

लीक झालेल्या 70 लाख युजर्संचा डेटा वैध आहे की नाही याची पडताळणी झाली नसली तरी इंटरनेट संशोधकाने काही वापरकर्त्यांचा डेटा तपासला असून बऱ्यापैकी वैध असल्याचे जाणवले आहे. मला वाटते की एखाद्याने हा डेटा किंवा लिंक्स डार्क वेबवर विकल्यानंतर तो सार्वजनिक झाला. आर्थिक डेटा इंटरनेटवरील सर्वात महाग डेटा आहे, असे राजशेखर यांनी सांगितले आहे.