नवीन वर्षात TV, फ्रीजसह घरगुती वस्तूंच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ॲल्युमिनियम, स्टील आणि तांब्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नव वर्षात एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .

उत्पादकांच्या म्हणण्यानुसार पुरवठ्यात घट झाल्याने टेलिव्हिजन पॅनलच्या किमती दुपटी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. तर प्लास्टिकच्या किमतीतही वाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती शुल्कावर होणार आहे. एलजी, पॅनासोनिक आणि थॉमसन यासारख्या कंपन्यांच्या वस्तूंच्या किमतीत वाढ होईल. तर सोनी कंपनीने अद्याप वाढीव किमतीबाबत निर्णय घेतलेला नाही.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने येणाऱ्या काळात आमच्या काही उत्पादनांच्या किमतीत जवळपास 6 ते 7 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 10 ते 11 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे पॅनासोनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनिष शर्मा यांनी सांगितले आहे.

एलजी कंपनीकडून देखील नव्या वर्षात सात ते आठ टक्क्यांनी दरवाढ केली जाणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर सर्व उत्पादनांच्या किमतीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. कच्चा माल आणि तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्लास्टिकची गरजही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमतही वाढणार आहे, असे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी सांगितले आहे.