‘अलीबाबा’नं भारतात UC Browser च्या कार्यालयाला लावलं कुलूप, ‘एवढया’ कर्मचार्‍यांना केलं ‘बडतर्फ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने आता आपले यूसी ब्राउझर आणि न्यूज ऑपरेशन भारतात बंद केले आहेत. कंपनीने अलिबाबा पे- रोलवर काम करणारे सुमारे 26 भारतीय कर्मचार्‍यांनाही काढून टाकले आहे. सरकारने अ‍ॅप बंद केल्याचा हवाला देत कंपनीने सर्वांना बाहेर काढले आहे. मात्र या कर्मचार्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने म्हटले आहे. अलिबाबाने मुंबई व गुरुग्राम कार्यालय बंद करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे गुगलनंतर अलिबाबाचे यूसी ब्राउझर सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे आणि जॅक मा ची अलिबाबा जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे.

29 जून रोजी केंद्र सरकारने देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा हवाला देत यूसी ब्राउझर, यूसी न्यूज, विमेट, विचॅट, टिक- टॉक, शेअर इट अशा एकूण 59 चीनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. बऱ्याच मोबाईल अ‍ॅप्सचा गैरवापर करण्यासह सरकारकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अ‍ॅप्सवर भारतीय नागरिकांची महत्वाची माहिती चोरल्याचा देखील आरोप आहे.

अलिबाबाच्या या निर्णयामुळे सध्या कर्मचारी खूप नाराज आहेत आणि नवीन नोकरीच्या शोधात आहेत. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत भारत सरकारने ब्लॉक केलेल्या 59 अ‍ॅप्सना सरकारने 70 हून अधिक प्रश्नांची सविस्तर यादी दिली आहे, ज्याचे उत्तर त्यांना तीन आठवड्यांत द्यावे लागेल.