‘या’ कारणामुळं मिळाली नाही अर्णब गोस्वामींना पोलिस कोठडी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईनः वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात (anvay-naik-suicide-case) रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (republic-tv-arnab-goswami-) फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना रायगड पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिघांनाही पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून (alibaug-court-denies-police-custody) लावली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा फेरतपास करताना न्यायालयाची परवानगी न घेणे आणि आत्महत्या प्रकरणात तिघांचा थेट संबध प्रस्थापित करण्यात अपयश, या कारणांमुळे मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी तिनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अर्णब यांना बुधवारी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. फेरवैद्यकीय तपासणीनंतर हा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. यानंतर अर्णब व इतर दोन आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता. एखाद्या प्रकरणासाठी रात्री उशिरापर्यंत अलिबाग येथील न्यायालय सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात तपासात काही निष्पन्न झाले नाही असा अहवाल दिला आहे. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. हा अहवाल मागे घेऊन फेरतपास करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला असला तरी न्यायालयाने त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा यावेळी आरोपींच्या वतीने उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला. गोस्वामींच्या वतीने वकील गौरव पारकर, फिरोज शेख यांच्यावतीने वकील निहा राऊत तर नितेश सारडा यांच्यावतीने वकील सुशील पाटील यांनी बाजू मांडली. तर सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ यांनी काम पाहिले.

या प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपींची गरज आहे. या प्रकरणातील कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासायची आहेत. त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे अशी मागणी सरकारी वकिलाने केली. मात्र आरोपींच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढला.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आले नाही. समरी रिपोर्ट मान्य झाल्यास पुन्हा केचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही. अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबध प्रस्थापित व्हायला हवा. तो पोलिसांना करता आला नाही, असे निरीक्षण न्यायायाने यावेळी नोंदवले.