अलिबाग : खांदेरी किल्यावर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, 2 गटात तुफान हाणामारी

अलिबाग, पोलीसनामा ऑनलाईन :  येथील खांदेरी किल्ल्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले असून मुंबई आणि अलिबाग येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. अलिबाग पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रात असलेल्या खांदेरी किल्यावर मुंबई येथून ५० ते ६० जणांचा एक ग्रुप भ्रमंतीसाठी आला होता. त्याचवेळी खांदेरी किल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी आक्षीतील ३० ते ४० जणही तेथे आले होते. त्यानंतर आक्षीतील आणि मुंबईतील पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बसले होते. यावेळी आक्षी मधील एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाइलची मागणी केली. मुंबईतील त्या पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचाच राग आक्षी पर्यटकाला आला आणि त्याने त्या पर्यटकाचा मोबाईल पाण्यात फेकला. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली. मात्र काही वेळाने सर्व शांत झाले.

मात्र, सायंकाळी मुंबईतील पर्यटक हे जाण्यास निघाले, त्यावेळी त्यातील एका तरुणाने ‘निघतो भावांनो’ असे म्हंटला. यावर आक्षीतील तरुणांनी अपशब्द वापरल्याने दोन्ही गटातील वाद पेटला, त्यानंतर झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झालेल्या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

किल्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी घाला :
अलिबाग जवळच्या समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात. या पर्यटकांकडून किल्यावर मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले जाते. ज्यानंतर पर्यटक तेथे धिंगाणा घालतात आणि ऐतिहासिक वास्तुचे पावित्र राखले जात नाही. त्यामुळे किल्ला परिसरात मद्यप्राशन करण्यास बंदी घालावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

Visit : Policenama.com