Lockdown 5.0 : परगावी, परराज्यात अडकून पडलेल्यांना मोठा दिलासा ! कंटेन्मेंट झोन सोडून इतर कोणालाही प्रवासासाठी पासची गरज नाही : केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आज (शनिवार) एक मोठं पाऊल उचचलं आहे. 31 मे नंतर 30 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन सोडून इतर कोणालाही प्रवास करावयाचा असेल तर त्यांना पासची गरज लागणार नाही असं सरकारनं जाहीर केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून परगावी तसेच परराज्या अडकलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

8 जून नंतर नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल आणि रेस्टॉरंट हे सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेकांचा जीव भांडयात पडला आहे. सर्वात मोठा निर्णय म्हणजे केंद्र सरकारनं प्रवासावरील निर्बंध हटवले आहेत. राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील वाहतूक खुली करण्यात आली आहे. आता राज्यात अथवा परराज्यात जाण्यासाठी परवानगी अथवा पासची गरज नसणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा, जिम, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या परवानगीबाबत परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं राज्यातंर्गत आणि परराज्यातील वाहतूक खुली केल्यामुळं लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोनमध्ये राहणार्‍यांना प्रवास करताना येणार नाही आणि कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारनं राज्यांतर्गत आणि परराज्यातील वहातूकीवरील निर्बंध उठवले असले तरी राज्य सरकार याबाबत वेगळा निर्णय देखीलघेऊ शकतं.