क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – क्षयरोग निर्मुलन हे केवळ शासकीय यंत्रणेतील लोकांनी सहभाग घेऊन होणार नाही. त्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, अशासकीय संस्था व समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या क्षयरोग विभागातर्फे जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, राज्य क्षयरोग विभागाचे उपसंचालक डॉ. मधुकर पवार, डॉ. घोरपडे, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. विशाल पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिश पाटील, डॉ. अनिल भामरे, डॉ. जे. सी. पाटील, एन. आर. शेख आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मधुकर पवार यांनी देश व राज्य पातळीवरील क्षयरोगाची स्थिती व निर्मुलनासाठी उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. बी. बी. माळी यांनी तर सूत्रसंचालन वाहिदअली सैय्यद यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान, जादूगार रुबाब हैदर यांनी जादूच्या प्रयोगातून क्षयरोगाची लक्षणे, निदान, उपचार पध्दती याबाबत माहिती दिली. क्षयरोग सप्ताहानिमित्त आयोजित रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.

शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी १० ऑटो रिक्षांना क्षयरोग जनजागृतीपर बॅनर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. तसेच जो.रा.सीटी हायस्कूल, न्यू सीटी हायस्कूल व शासकीय परीचारिका प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थ्यांद्वारे शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग व शहर क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.