Coronavirus Lockdown : ‘कोरोना’मुळे फुलशेतीचा उठला बाजार, निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना बसला मोठा फटका

पुणे : प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सतत एक चिंता भेडसावते ती शेतमालाच्या भावाची. डिसेंबर ते मे महिन्या दरम्यान फुलशेतीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अक्षरशः बाजार उठला आहे.

सोरतापवाडीचे (ता. हवेली) सरपंच सुदर्शन चौधरी म्हणाले की, आमच्या गावामध्ये साडेआठशे हेक्टर क्षेत्रापैकी चारशे हेक्टरमध्ये फक्त फुलशेती केली जाते. फुलशेतीकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. लॉकडाऊन जाहीर केला, त्यातून शेती अत्यावश्यक सेवा म्हणून वगळली. मात्र 25 मार्चपासून फुलशेती बाजार बंद केला. गुलाब, बिजली, गोंडा, गुलछडी, लीली, शेवंती अशी फुलशेती फुलविली जाते. त्याचबरोबर पॉलीहाऊसमध्ये जर्बेरा, कार्निशियन, डच पद्धतीच्या गुलाबामध्ये अनेक प्रकाराचे उत्पादन घेतले जाते. मल्चिंग पेपर लावून ही पिके घेतली जात आहे. एका एकरामध्ये शेतकरी किमान 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. फुलशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही ट्वीट केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लग्नसराई, जत्रा, यात्रा, उत्सव आणि सणवारासाठी विविध फुलांना मोठी मागणी असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट केले आणि विविध जातीची फुले बहरात आली. मात्र, लॉकडाऊनमुळे फुलांचा बाजार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना बहरलेली फुले अक्षरशः उकिरड्यावर टाकून द्यावी लागली. पुणे शहर आणि आसपासच्या गुलाबाच्या नर्सरीतील टवटवीत बहरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या उन्हामुळे गळून पडू लागल्याचे पाहून शेतकरी हताश झाला आहे. राज्यभरातील हजारो हेक्टरवरील फुलांचे मागणीअभावी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे.

देशभरात फुलांच्या शेतीचा व्यापार वाढीस लागला आहे. खेळते भांडवल देणारे हे निर्यातक्षम उत्पादन राज्यभरात घेतले जात आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी लाखो रुपये (कमीत कमी 25 लाख) खर्च करून हरितगृह (पॉलीहाऊस) उभारली आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारच बंद असल्यामुळे निर्यातही थांबली. फुलशेतीसाठी केलेली मेहनतही वाया गेली, उत्पादन खर्च नव्हे, तर यावर्षीच पदरी काहीच पडले नाही. फुलांचा पर्यायी वापर होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पुणे-सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाच्या नर्सरी आहेत. अत्याधुनिक पद्धतीने फुलशेती करून चांगले उत्पन्न घेत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक घडी बसविली आहे. एकच पिक घेण्यापेक्षा मागणी तसा पुरवठा या उक्तीप्रमाणे अनेकांनी फुलशेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्याचा त्यांना आतापर्यंत चांगला फायदाही झाला आहे. एकरामध्ये नव्हे, गुंठ्यामध्ये चांगले उत्पन्न घेण्याची कलाही अनेकांनी अवगत केली आहे. पॉली हाऊससारख्या तंत्रज्ञानाचा अलीकडे सर्रास अवलंब केला जात आहे. ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. उन्हाळ्यामध्ये मोगरा, झेंडू, शेवती, जाई-जुई फुलांना मोठी मागणी असते. कमी पाण्यामध्ये फुलशेतीतून चांगले उत्पन्न घेता येते. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे फुलशेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे, अशी भावना थेऊरचे शेतकरी शिवाजी ज्ञानोबा काळभोर यांनी सांगितले.

राज्यभरातून उत्पादित केलेल्या फुलांना परदेशात गुलाब, जरबेरा, ग्लॅडओलस, कार्नेशन, आर्किड, अ‍ॅन्थुरियनला मोठी मागणी असते. या फुलांचा दर नगाप्रमाणे ठरविला जातो. त्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. देशांतर्गत सणासुदीला जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, अ‍ॅस्टर, शेवंती अशा विविध जातींची फुले भाव खाऊन जातात. मात्र, डिसेंबरपासून चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भवानंतर फुलांच्या निर्यातीला गळती लागली आणि ती आज पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीमधील व्हॅलेंटाइन डेसाठीची गुलाब फुलांची निर्यात आणि गुढीपाडव्याला राज्यातच विकलेली झेंडूची फुले ही राज्यातील फुलशेतकऱ्यांसाठीची एकमेव कमाई ठरली आहे.