2 दिवसांत सर्वतोपरी मदत, मुख्यमंत्री ठाकरेंचा पुन्हा पुनरूच्चार !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –   आपण हेक्टरी 50 हजार रूपयांच्या मदतीची मागणी करीत होतो. तेंव्हा कोवीडचे संकट नव्हते आणि हक्काच्या जीएसटीची रक्कमही आताप्रमाणे तुंबलेली नव्हती. सबंध लोकप्रियतेसाठी घोषणा करणारांपैकी आपण नाही. निर्णय जाहीर करायचा आणि तो मागे घ्यायचा हा आपला स्वभाव नाही. जे करू, ते ठोस करू. पुढील दोन दिवसांत सर्वतोपरी मदत करणार असल्याचा पुनरूच्चार पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. नुकसानीच्या पाहणीनंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, इकडे अतिवृष्टी सुरू असताना आपण प्रत्येक क्षणाची माहिती घेत होतो. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आपण स्वतः आलो आहोत. मदत किती, कशी आणि केंव्हा करावयाची? याबाबत मुंबईमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे. आणखी काही ठिकाणचे पंचनामे पूर्ण होणे बाकी आहे. तोवर ज्यांची जनावरे दगावली, ज्या घरात अतिवृष्टीमुळे मृत्यू झाले, त्यापैकी काही जणांना प्रातिनिधीक मदत केली आहे. दसरा दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकर्‍यांच्या डोळ्यातील पाणी आपण पाहू शकणार नाही. विमा कंपन्यांशी देखील चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांतच ठोस निर्णय जाहीर केला जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या टीकेकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. कोवीडचा मुकाबला ज्या परीने महाराष्ट्राने केला. त्या तुलनेत अन्य राज्यात क्वचित काम झाले आहे. कोवीडमुळे सध्या अर्थकारण पूर्णतः मोडकळीस आले आहे. हक्काचे जीएसटीचे पैसे केंद्राकडे थकले आहेत. ते मिळाले असते तर तेलंगणा राज्याप्रमाणे आपणही तत्काळ मदत जाहीर केली असती, असा निर्वाळाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड का निसटत आहेत?

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजपाची मुळे रूजविली आहेत. अत्यंत स्पष्ट वक्तेपणा असलेले खडसे अभ्यासू आहेत. त्यांचे महाविकास आघाडी परिवारात स्वागत आहे. मात्र जुन्या मित्राच्या काळजीपोटी काही प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना पायाचे दगड का निसटून जात आहेत? याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता उध्दव ठाकरे यांनी टोला लगावला.