Pune News : पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यास मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालय कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि.5) दिले.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये 31 मार्च 2020 पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्याला विविध ऐतिहासिक वास्तुंचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही ठिकाण नागरिकांसाठी खुली करण्याची सातत्याने मागणी होत होती.

दरम्यान, अनलॉक प्रक्रिये अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करुन विविध बाबींना निर्बंधनातून वगळले गेले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इत्यादी खुली करण्यासंदर्भात 4 जून 2020 रोजी मानक कार्यप्रणाली लागु केलेली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक, वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले आहेत.

या ठिकाणावर कोविड -19 मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक सोशल डिस्टन्स बाळगणे, मास्कचा वापर, हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.