Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री 10 नंतर सर्व हॉटेल ढाबे बंद – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज (बुधवार) सायंकाळी थंडावल्या. राज्यात 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे ग्रामीण भागात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.13) ते शुक्रवार (दि.15) या कालावधीत ढाबे, हॉटेल, पानटपऱ्या रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले आहेत.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.15) रोजी मतदान होणार आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आज पासून तीन दिवस ढाबे, हॉटेल, पानटपऱ्या रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत बदं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तीन दिवस ‘ड्राय डे’
ग्रामपंचाय निवडणुकांमुळे तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. 14 जानेवारीला मतदानाच्या अगोदरचा दिवस, 15 जानेवारीला मतदानाचा दिवस आणि 18 जानेवारीला मतमोजणीचा दिवस असून या दिवशी मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. निवडणुका नसलेल्या परिसरातील दुकाने आणि बिअर बार सुरु राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.