ऑल इंडिया बार परीक्षा-XV : देशभरातील 1.20 लाख वकील 154 केंद्रांवर राहणार हजर

पोलीसनामा ऑनलाईन : बार कौन्सिल ऑफ इंडियाने ( BCI) दिलेल्या माहितीनुसार 24 जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय बार परीक्षा ( AIBE) – -XV साठी देशभरातून सुमारे 1,20,000 अधिवक्ता उपस्थित राहणार आहेत. 52 शहरांमधील 154 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. वकील म्हणून करिअर सुरू करण्यासाठी एआयबीई परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. बीसीआय ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आयोजित करते, आधीच नोंदणीकृत वकील आणि कायदा पदवीधर विद्यार्थी अखिल भारतीय बार परीक्षेत भाग घेतात आणि उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात मान्यता मिळते.

दरम्यान, मागील परीक्षेदरम्यान अयोग्य मार्गाचा उपयोग केल्याबद्दल 9 परीक्षा केंद्रांवर परीक्षा रद्द करण्यात आली होती. या वेळी अशा परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अन्य केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने सांगितले कि, या वेळी अशा उमेदवारांकडून कोणतीही फी आकारली गेली नाही. परीक्षा केंद्रांवर मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर करण्यास परवानगी नाही. आजूबाजूच्या परिसरातील कोणीही फोन किंवा गॅझेट वापरू शकणार नाही याची खात्री करण्यासाठी सुमारे 50 केंद्रांवर सिग्नल जॅमर वापरला जाईल.