अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून लढणार असल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या नावाला कडाडून विरोध सुरू झाला. विशेषतः ब्राह्मण महासंघाने पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला होता. आज चंद्रकांत पाटील आणि महासंघाचे पदाधिकारी यांच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर ब्राह्मण महासंघाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. आज झालेल्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून आगामी सरकारच्या माध्यमातून त्या तताडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन कोथरुड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. परिणामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभेतील उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

आज झालेल्या बैठकीनंतर महासंघाने पाठिंबा देण्याबाबतचे अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. या पत्रकावर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह जितेंद्र कुलकर्णी, प्रवक्ते आनंद दवे यांच्या स्वाक्षरी आहेत. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यामध्ये ब्राह्मण समाजासाठीचे आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदी प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

visit : Policenama.com