विधानसभा 2019 : पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघासह MIM नं केले ‘या’ 3 ठिकाणचे उमेदवार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचितसोबतची आघाडी तुटल्यानंतर एमआयएमने विधानसभेचे उमेदावार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित सोबतची युती तुटल्याचे जाहिर केल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना धक्का देत विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मालेगाव येथून मुफ्ती मोहंमद इस्माईल याना उमेदवारी देण्यात आली आहे. एमआयएमने उमेदवारांची घोषणा घेऊन राज्यात उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तीक नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी एमआयएम आणि भरिपचा काडीमोड झाला. दोघांमध्ये मोठी फूट पडली असून आंबेडकरांच्या जागावाटपाच्या भूमिकेवर नाराज होऊन एमआयएमने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

एमआयएम राज्यात ७४ जागांवर स्वबळावर लढणार
वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमने ७४ जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये आज मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती जलिल यांनी दिली.