ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत कोरोना काळात लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू उठवला जात आहे. आत राज्य सरकारनं नवीन परिपत्रक जारी केलं आहे. यात उद्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्यानं मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसंच कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनं राज्यातील सर्व ग्रंथालये 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु शाळेतील शिक्षक वर्गाला मात्र 50 टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

मेट्रो सुरू करण्याबाबतची एसओपी लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यानं मुंबईतील मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन बाहेरील दुकानं सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.