सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, दीड लाखांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पोलिस दलातर्फे सोमवारी रात्री जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दोनशेहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर 374 वाहनचालकांवर कारवाई करून दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रस्ता, जंक्‍शन येथे नाकाबंदी करण्यात आली होती. 44 अधिकारी 354 पोलिस कर्मचारी आणि 42 होमगार्ड यांचा यामध्ये सहभाग होता.

पोलिसांना चकवा देऊन पळणारे, चोरीच्या उद्देशाने फिरणारे, विना परवाना देशी दारू विक्री करणारे, जुगार-मटका अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. मर्यादेपेक्षा अधिक काळ हॉटेल्स, ढाबे सुरू ठेवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. शहरातील पाच हॉटेल्स, ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य चौकात नाकेबंदी करण्यात आली होती. हजारवर वाहनांची तपासणी करून 374 बेदकार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 41 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक करण्यात येणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/