सांगलीत ‘ऑल आउट’ मध्ये सव्वा लाखांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन  – जिल्हा पोलिस दलातर्फे सोमवारी रात्री जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. दोनशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या साडेसहाशे वाहनचालकांवर कारवाई करून एक लाख 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रस्ता, जंक्‍शन येथे विशेष नजर ठेवली जात आहे. सोमवारी रात्री केलेल्या ऑल आऊट ऑपरेशन मध्ये 79 अधिकारी 461 पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांना चकवा देऊन पळणारे, विना परवाना देशी दारू विक्री करणारे, जुगार-मटका अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. दीड हजारवर वाहनांची तपासणी करून 655 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.