Coronavirus : ‘कोरोना’संदर्भात पंतप्रधान मोदींची बुधवारी सर्वपक्षीय बैठक

 पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या आपत्तीवर उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बुधवारी दि. 8 एप्रिलला सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनामहासाथीच्या आपत्तीनंतर सुमारे दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच विरोधकांना विश्वासात घेतले जात आहे. या बैठकीसंदर्भातील पत्र संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.

देशवासीयांना मोदींनी रविवारी रात्री 9 वाजता दिवे लावण्याचा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांनी प्रतीकात्मक प्रयोग थांबवून कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक बिकट परिस्थितीबाबत लोकांशी संवाद साधला पाहिजे. 1 लाख 15 हजार कोटींचा मदतनिधी तुटपुंजा असून आर्थिक मुद्दयावर मोदी भाष्य केले पाहिजे, अशी तीव्र टीका विरोधकांनी केली. विरोधी पक्षांकडून सातत्याने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली जात होती; पण कोरोनामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वित्त विधेयकांच्या मंजुरीनंतर 16 मार्च रोजी स्थगित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी विरोधकांशी संवाद साधलेला नाही. बुधवारी होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आर्थिक समस्येबाबत आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला दोन पत्रे पाठवली असून त्यात कोरोनामुळे गरीब कुटुंबांच्या हालअपेष्टा, त्यांना गरजेची असलेली आर्थिक मदत अशा विविध मुद्दयांवर पंतप्रधानांनी प्राधान्याने लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
संसदेत पाचपेक्षा जास्त खासदार असलेल्या राजकीय पक्षांच्या दोन्ही सभागृहांतील गटनेत्यांना या बैठकीला बोलावले जाणार आहे. कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपायांची माहिती या नेत्यांना दिली जाईल. या बैठकीला संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे गटनेता थावरचंद गेहलोत हे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like