‘तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला अन् आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का ?’ मुलाचा मन सुन्न करणारा Video व्हायरल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आहे. आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?, असे म्हणणा-या एका मुलाचा मन सुन्न करणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राहुल राज असे या 23 वर्षीय मुलाचे नाव आहे. राहुलच्या आईवडिलांचा पेटवून घेतल्याने मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अथियानोर गावातील ही घटना आहे. पोलीस घराबाहेर काढत असल्याने घाबरलेल्या एका दाम्पत्याने स्वतःला पेटवून घेतले. यात दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलगा राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आहे. आता त्यांचे अंत्यसंस्कारही का करू देत नाही, असे व्हिडीओमध्ये राहुलने म्हटले आहे. व्हिडीओमध्ये राहुल मृतदेह दफन करण्यासाठी जमीन खोदताना दिसत आहे. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण शांतपणे हे दृश्य पाहत असल्याचे दिसून येत आहे. केरळच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी दाम्पत्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अथियानोर गावात राहुलच्या वडिलांनी यांनी 1300 स्क्वेअर फूट जागेवर घर बांधले होते. न्यायालयाने ही जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी दि. 22 डिसेंबर रोजी स्वत:ला चुकून पेटवून घेतले. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. राहुलच्या वडिलांनी जबाबात पोलिसांना दूर ठेवण्यासाठी मी लायटर पेटवला होता. माझी आत्महत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती असे म्हटले आहे. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने लाईटर फटका मारल्याने आमच्यावर पडल्याने आग लागल्याचे देखील सांगितले आहे.

राहुलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस 22 डिसेंबर रोजी पोलीस आमच्या घरी पोहचले. वडिलांनी स्थानिक मुन्सिफ न्यायालयाकडून हद्दपार करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळविली होती. मात्र वडिलांना या आदेशाची प्रत मिळाली नव्हती. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार वडिलांना सर्व वस्तू घेऊन आमच्या घराबाहेर पडायला सांगितले, असे म्हटले आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर राहुलने त्यांना दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याला यासाठी विरोध केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.