‘सपा’चे खा. आझम खान यांना मोठा ‘झटका’ ! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मुलगा अब्दुल्लाची ‘आमदार’की रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे आझम खान यांना मोठा झटका मिळाला आहे. अलाहाबाद हाय कार्टानं आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांची आमदारकी रद्द केली आहे. आरोप आहे की निवडणूक लढताना अब्दुल्ला आझम यांचं वय पूर्ण नव्हतं. यासाठी त्यांनी खोट्या कागदपत्रांचा सहारा घेतला होता.

अब्दुल्ला आझम यांच्याविरोधात बसपा उमेदवार राहिलेले नवाब काझीम अली यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, अब्दुल्ला यांचं वय 25 वर्ष नव्हतं. अब्दुल्ला यांनी खोटी कागदपत्रे दाखवत निवडणूक लढवली. यावर सुनावणीदरम्यान हाय कोर्टानं 27 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर जस्टीस एसपी केसरवानी यांच्या खंडपीठानं निर्णयाची सुनावणी केली आहे.

स्वार विधानसभेतून जिंकले होते अब्दुल्ला

अब्दुल्ला आझम हे सपा खासदार आझम खान यांचे पुत्र आहेत. 2017 च्या युपी विधानसभा निवडणुकीत अब्दुल्ला यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. अब्दुल्ला यांनी रामपूर भागातील स्वार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अब्दुल्ला आझम यांनी भाजप उमेदवार लक्ष्मी सैनी यांचा 50 हजार मतांनी पराभव केला होता. बसपाचे नवाब काझीम अली हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

भाजप नेत्यानंही केली होती तक्रार दाखल

यावर्षी जानेवारीत भाजपच्या आकाश सक्सेना यांच्या तक्रारीनंतर आझम खान यांच्या पूर्ण कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अब्दुल्ला आझम यांनी दोन जन्माचे दाखले बनवल्याचा आरोप त्यांनी केला होता. अब्दुल्ला आझम यांचा एक दाखला 28 जून 2012 रोजी रामपूर नगरपरिषदेकडून जारी करण्यात आला आहे. हा दाखला आझम खान आणि डॉ. तनीज फातिमा यांच्या शपथपत्राच्या आधारावर जारी करण्यात आला होता. ज्यात अब्दुल्ला यांचं जन्म स्थान रामपूर दाखवण्यात आलं होतं. दुसरा दाखला 21 जानेवारी 2015 रोजी लखनऊ महापालिकेमधून बनवण्यात आला आहे. जो क्वीन मेरी रुग्णलयातून डुप्लीकेट जन्माच्या दाखल्याच्या आधारावर जारी करण्यात आला आहे. यात अब्दुल्लाचं जन्म स्थान लखनऊ दाखवण्यात आलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/